Dhule News: महाविद्यालयांच्या परिसरातील अवैध गुटखा विक्रीविरोधात तरुणाई आक्रमक
युवासेना आणि विद्यार्थ्यांचे जोरदार निदर्शने; विक्रेत्यांवर तत्काळ कारवाईची मागणी
धुळे | प्रतिनिधी :
शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध गुटखा, मावा आणि नशायुक्त पदार्थांच्या विक्रीविरोधात तरुणाई आक्रमक झाली. युवासेनेच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच युवक-युवतींनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. गुटखा विक्री करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करून शैक्षणिक परिसर व्यसनमुक्त करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शहरातील काही शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात १०० मीटरच्या आत असलेल्या टपऱ्यांवर गुटखा, मावा आणि इतर नशायुक्त पदार्थांची कथितपणे विक्री होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या पदार्थांच्या सहज उपलब्धतेमुळे विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जाण्याची शक्यता असून, त्यांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली.
निदर्शनादरम्यान “गुटखा विक्री बंद झालीच पाहिजे”, “तरुणांचे भवितव्य उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा” आणि “प्रशासन होश में आओ” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनात विद्यार्थिनींचाही मोठ्या संख्येने सहभाग होता.
आंदोलकांनी महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरातील बेकायदेशीर टपऱ्यांची तपासणी करून कारवाई करावी, गुटखा पुरवठादार व विक्रेत्यांवर FDA तसेच पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी आणि शैक्षणिक परिसरात नियमित पोलीस गस्त सुरू करावी, अशा प्रमुख मागण्या केल्या.
दरम्यान, प्रशासनाने या प्रश्नावर तत्काळ ठोस पावले उचलली नाहीत, तर यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवासेना व उपस्थित विद्यार्थी-युवकांनी दिला.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख कुणाल कानकाटे, महानगरप्रमुख मनोज जाधव, महानगर चिटणीस जयेश फुलपगारे, महानगर समन्वयक तरबेज शेख, अविनाश जोंधळे, तसेच महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी, युवक व युवती उपस्थित होते.
कुणाल कानकाटे, युवासेना जिल्हाप्रमुख, धुळे


