धुळे : शिरपूरमध्ये 90 गुंठ्यांवर गांजाची बेकायदा शेती; 7 कोटी 68 लाखांचा गांजा जप्त
शिरपूर, धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे
९० गुंठ्यांवर बेकायदा लागवड; ३ हजार ७२ किलो गांजाची झाडे पोलिसांच्या हाती
शिरपूर तालुक्यात गांजाच्या बेकायदा शेतीवर पोलिस आणि वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. भोरखेडा, रोहिणी आणि खंबाळे परिसरातील अतिदुर्गम भागात तब्बल ९० गुंठे क्षेत्रावर गांजाची लागवड करण्यात आल्याचे या कारवाईत समोर आले आहे.
शिरपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिस ठाणे आणि वनविभागाच्या संयुक्त पथकाने संबंधित परिसरात छापा टाकला. या कारवाईत एकूण ३ हजार ७२ किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत ७ कोटी ६८ लाख रुपये आहे. अतिदुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड करण्यात आल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, कारवाईदरम्यान पोलिस आणि वनविभागाच्या पथकाने गांजाची झाडे उपटून त्यांची नासधूस केली. या प्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मोठ्या प्रमाणावर गांजाची बेकायदा लागवड उघडकीस आल्याने या कारवाईमुळे गांजा तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या शेतीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जाणार आहे.


