धुळ्यात LCB चा मोठा छापा; आलिशान कारसह १० तलवारी जप्त, दोघे ताब्यात
प्रतिनिधी : नागिंद मोरे
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आलिशान कारमधून वाहतूक करण्यात येणाऱ्या तब्बल 10 धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. या कारवाईत तलवारींसह आलिशान कार असा 5 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना सुरतहून दोंडाईचाकडे तलवारींचा साठा आणला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने सापळा रचून संशयित आलिशान कार अडवली.
कारची झडती घेतली असता त्यामध्ये 10 धारदार तलवारी आढळून आल्या. पोलिसांनी तत्काळ तलवारींसह कार ताब्यात घेतली. या कारवाईदरम्यान मुख्य संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, त्याच्या एका साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, तलवारी नेमक्या कोणासाठी आणि कोणत्या उद्देशाने आणल्या जात होत्या, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
विशाल आनंद, पोलीस अधीक्षक, धुळे


