शिंदखेडा: तहसील कार्यालयातून जप्त ट्रॅक्टरची भरदिवसा चोरी; मालक-चालकच निघाले चोर…
शिंदखेडा, धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे
शिंदखेडा तहसील कार्यालयाच्या आवारात महसूल विभागाने जप्त करून ठेवलेला वाळूने भरलेला ट्रॅक्टर चोरीला गेल्याच्या घटनेचा अखेर उलगडा झाला आहे. विशेष म्हणजे, महसूल विभागाने ज्या ट्रॅक्टरवर कारवाई केली होती, त्याच ट्रॅक्टरचा मालक आणि चालकच चोरीच्या प्रकरणात आरोपी निघाले आहेत.
शिंदखेडा तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक करताना आढळून आलेला वाळूने भरलेला ट्रॅक्टर महसुली कारवाईसाठी शिंदखेडा तहसील कार्यालयाच्या आवारात जप्त करून ठेवण्यात आला होता. मात्र, दोन इसमांनी तहसील कार्यालयाच्या आवारात प्रवेश करून हा जप्त केलेला ट्रॅक्टर भरदिवसा चोरून नेला.
या प्रकरणी मंडळ अधिकारी मोहन पाटील यांच्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजच्या आधारे पोलिसांना ट्रॅक्टरचा मालक निलेश पाटील आणि चालक अजय भिल यांच्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली.
पोलिसांच्या तपासात दोघांचा चोरीच्या घटनेशी संबंध असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेला ट्रॅक्टर आणि ट्रॉली असा एकूण 4 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
महसूल विभागाने कारवाई करून जप्त केलेले वाहनच पुन्हा चोरीला गेल्याने या घटनेमुळे शासकीय कार्यालयांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिंदखेडा पोलीस करत आहेत.


