धुळ्यात पशुखाद्याच्या आड विदेशी दारूची तस्करी; एलसीबीची मोठी कारवाई, 20.50 लाखांचा मुद्देमाल जप्त
धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे
मुंबई-आग्रा महामार्गावर तस्करीचा पर्दाफाश; कंटेनरमधून 10.32 लाखांची विदेशी दारू जप्त
धुळ्यात पशुखाद्याच्या गोण्यांआड विदेशी दारूची तस्करी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील अवधान चौफुली परिसरात धुळे एलसीबीने कारवाई करत संशयित कंटेनर पकडला.
पोलिसांनी कंटेनरची तपासणी केली असता पशुखाद्याच्या गोण्यांआड लपवून ठेवलेला 10 लाख 320 रुपयांचा विदेशी दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी दारूसाठ्यासह कंटेनर आणि पशुखाद्य असा एकूण 20 लाख 50 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरवर धुळे एलसीबीच्या पथकाने पाळत ठेवली होती. अवधान चौफुली जवळ कंटेनर अडवून त्याची तपासणी करण्यात आली. यावेळी पशुखाद्याच्या गोण्यांआड विदेशी मद्याचा मोठा साठा लपवून ठेवण्यात आल्याचे समोर आले.
या प्रकरणी चौघांविरुद्ध मोहाडी नगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पशुखाद्याच्या नावाखाली विदेशी मद्याची वाहतूक केल्याने या कारवाईतून अवैध मद्य वाहतुकीचा नवा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मोहाडी नगर पोलीस करत आहेत.


