धुळे : विवाहित महिलेचे फोटो काढले, व्हिडिओ बनवला अन् ब्लॅकमेल केल्याचा आरोप; तिघांविरुद्ध गुन्हा
रामदेव बाबा नगर परिसरातील घटना; बलात्कार, धमकी, ब्लॅकमेलिंगसह ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल
धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे
धुळे शहरातील 80 फुटी रोडवरील रामदेव बाबा नगर परिसरात एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध बलात्कार, धमकी, ब्लॅकमेलिंगसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, प्रकृती बिघडल्याने ती रस्त्याने जात असताना तिने एका अनोळखी व्यक्तीकडून लिफ्ट मागितली होती. त्यानंतर परिसरातील काही व्यक्तींनी तिचे त्या व्यक्तीसोबतचे फोटो काढल्याचा आरोप आहे.
“हे फोटो तुझ्या पतीला दाखवतो,” अशी धमकी देत संबंधितांनी तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. तसेच फोटो आणि व्हिडिओच्या आधारे दबाव टाकून, घरात कोणी नसताना आपल्यावर जबरदस्ती करण्यात आली आणि पैसेही घेतल्याचा गंभीर आरोप महिलेने केला आहे.
या प्रकरणी साहिल हबीब पिंजारी, बाबू इरफान शाह आणि समद शेख जब्बार यांच्याविरोधात आझादनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आझाद नगर पोलिसांनी तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी आझादनगर पोलीस ठाण्यात
घटना समोर आल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आझादनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले.
दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलिसांकडून या प्रकरणात योग्य ती कायदेशीर कारवाई केली जात असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी दिली.
या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेत निश्चित होणार आहे.


