धुळे; घरफोडी करणाऱ्या टोळीला पोलिसांचा दणका; 12 गुन्ह्यांची उकल, 120 ग्रॅमपेक्षा जास्त सोनं जप्त
धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे
धुळे तालुका परिसरात वाढलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांना अखेर लगाम लावण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि धुळे तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सराईत चोरट्यासह त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत तब्बल 12 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, आरोपींकडून 120 ग्रॅमपेक्षा जास्त सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
धुळे तालुक्यातील नेर येथील सेवानिवृत्त सुभेदार मेजर अनिल सूर्यवंशी यांच्या बंद घरात चोरी झाली होती. चोरट्यांनी घरातून पिस्तूल, दोन मॅगझीन, दहा जिवंत राउंड, रोख रक्कम आणि सोन्याची अंगठी लंपास केली होती.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यातून फत्तेसिंग मिलनसिंग भादा याच्यासह त्याच्या साथीदारांचा पोलिसांना शोध लागला.
पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस कस्टडीदरम्यान चौकशी केली. चौकशीत आरोपीने विविध ठिकाणी केलेल्या चोरीच्या गुन्ह्यांबाबत माहिती दिल्याची पोलिसांची माहिती आहे.
यानंतर धुळे तालुका पोलिसांच्या शोध पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींकडून मोठ्या प्रमाणात सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला.
या कारवाईमुळे धुळे तालुका परिसरात दाखल असलेल्या 12 घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लागल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
घरफोडीच्या मालिकेचा उलगडा झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, या टोळीने आणखी कुठे चोरी केली आहे का, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


