धुळ्याच्या SRPF जवानाचा गडचिरोलीत सर्पदंशाने मृत्यू; अंघोळ करताना विषारी सापाचा दंश
धुळे | प्रतिनिधी :
नक्षलविरोधी मोहिमेसाठी गडचिरोली जिल्ह्यात तैनात असलेल्या धुळे येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) जवानाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. चामोर्शी तालुक्यातील रेगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली. राहुल प्रभाकर शिनगारे (वय 37) असे मृत जवानाचे नाव असून, ते धुळे येथील SRPF गट क्रमांक 6 मध्ये कार्यरत होते.
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानासाठी SRPFच्या विविध तुकड्या तैनात केल्या जातात. धुळे येथील SRPF गट क्रमांक 6 मधील ‘एफ’ कंपनी सुमारे दीड महिन्यांपूर्वी गडचिरोलीत दाखल झाली होती. या तुकडीतील पोलीस नाईक राहुल शिनगारे यांची रेगडी परिसरात बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली होती.
रेगडी पोलीस मदत केंद्राच्या परिसरात जवानांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. अंघोळीसाठी कॅम्पमध्ये मोठा हौद बांधण्यात आला आहे. मंगळवारी (6 ऑक्टोबर) सकाळी सुमारे सात वाजता शिनगारे अंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या हाताला विषारी सापाने दंश केला.
सर्पदंश होताच शिनगारे यांनी कॅम्पकडे धाव घेतली. सहकारी जवान आणि अधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, उपचारादरम्यान दुपारी 2.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला.
राहुल शिनगारे हे धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ जवान म्हणून सहकाऱ्यांमध्ये परिचित होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात आली.
सायंकाळी साडेपाच वाजता गडचिरोली येथील पोलीस कवायत मैदानावर त्यांच्या पार्थिवाला शोक सलामी देण्यात आली. यावेळी हवेत तीन फैरी झाडून शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्यासह SRPFचे अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि जवान यावेळी उपस्थित होते.
शिनगारे यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी धुळे येथे नेण्यात येणार आहे.


