धुळे: सावळदे तापी नदीपात्रात प्रेमी युगुलाचे मृतदेह; पायांना साखळी अन् कुलूप
धुळे | प्रतिनिधी: नागिंद मोरे
धुळे जिल्ह्यातील सावळदे येथील तापी नदीपात्रात आढळलेल्या तरुण-तरुणीच्या मृतदेहांची ओळख पटली असून, श्याम हरी पाटील आणि सपना पाटील अशी मृतांची नावे आहेत. दोघेही अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील मूळ रहिवासी होते. या घटनेत दोघांचेही पाय लोखंडी साखळीने बांधून त्याला कुलूप लावल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या पंचनाम्यात समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वीच या दोघांनी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर सावळदे येथील तापी नदीपात्रात त्यांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दोघांच्या पायांना साखळी बांधून कुलूप लावण्यात आल्याचे समोर आल्याने या घटनेचे गूढ अधिकच वाढले आहे.
मृत्यूमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट
श्याम पाटील आणि सपना पाटील यांच्या मृत्यूमागे नेमके काय कारण आहे, त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला की या घटनेमागे अन्य काही कारण आहे, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेमागील सत्य समोर येणार आहे.
नरडाणा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, सावळदे तापी पुलावर वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर येथे आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
धुळे न्यूज 24 | सत्य, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या


