धुळे : पिंपळनेरमध्ये घरफोडीचा पर्दाफाश; 5.88 लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज आणि रोकड हस्तगत
भरदिवसा झालेल्या चोरीचा पोलिसांकडून उलगडा; विधिसंघर्षग्रस्त बालिकेला ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर केले
पिंपळनेर, धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पोलिसांनी भरदिवसा झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करत तब्बल 5 लाख 88 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका विधिसंघर्षग्रस्त बालिकेला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
पिंपळनेर येथील साईबाबा कॉलनी परिसरात राहणाऱ्या माधुरी जाधव यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला.
घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे आणि पारंपरिक तपास पद्धतींच्या आधारे पोलिसांनी या घरफोडीचा उलगडा केला. तपासादरम्यान एका विधिसंघर्षग्रस्त बालिकेला ताब्यात घेण्यात आले.
5.88 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
या कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल हस्तगत केला आहे.
- सोन्याचे दागिने: 5 लाख 40 हजार रुपये
- चांदीचे दागिने: 36 हजार 500 रुपये
- रोख रक्कम: 12 हजार रुपये
अशा प्रकारे एकूण 5 लाख 88 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणातील विधिसंघर्षग्रस्त बालिकेला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे. पुढील तपास पिंपळनेर पोलीस करीत आहेत.
Dhule News 24 Network 🛜


