पिंपळनेरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! सलग दुसऱ्या दिवशी दोन बंद घरे फोडली; रोकड अन् पितळी भांडी लंपास
पिंपळनेर, धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहरात घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, स्वामी समर्थ नगरात सलग दुसऱ्या दिवशी चोरट्यांनी दोन बंद घरांना लक्ष्य केले आहे. या घटनांमध्ये सुमारे ५० हजार रुपयांची रोकड आणि पितळी भांड्यांसह मोठ्या प्रमाणात मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वामी समर्थ नगरातील नरेंद्र मुरलीधर भामरे हे वैद्यकीय उपचारासाठी नाशिक येथे गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला लक्ष्य केले. दोन दिवसांनंतर ते घरी परतले असता, घरातील कपाटे उघडी आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी परिसरात चौकशी केली.
दरम्यान, शेजारील नातेवाइकाच्या घराचाही कडी-कोयंडा तोडून चोरी करण्यात आल्याचे उघड झाले. या दोन्ही घरफोडीच्या घटनांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आल्याचे भामरे यांनी सांगितले.
स्वामी समर्थ नगरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
स्वामी समर्थ नगर परिसरात यापूर्वीही चोरीच्या घटना घडल्या असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. बंद घरांना लक्ष्य करून चोरटे सहजपणे चोरी करत असल्याने रहिवाशांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
पिंपळनेर शहरातील वाढत्या घरफोड्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी दिवसा आणि रात्रीची गस्त वाढवावी, तसेच चोरीच्या घटनांचा तपास करून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या या घरफोड्यांमुळे पिंपळनेर पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे राहिले आहे.


