Dhule News; दिवसा घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास! धुळे पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; मध्य प्रदेशातील दोघे अटकेत
धुळे | प्रतिनिधी: नागिंद मोरे
धुळ्यात दिवसाढवळ्या घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा धुळे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील मध्य प्रदेशातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ५ लाख ६९ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे घरफोडी करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.
धुळे शहरातील राधेश्याम अपार्टमेंटमध्ये घरफोडीची घटना घडली होती. अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा लाखोंचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि तपासाच्या आधारे मध्य प्रदेशातील दोन आरोपींना अटक केली. अक्रम अब्दुल गफार अब्बासी आणि जावेद अब्दुल गफार अब्बासी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचे दागिने आणि चांदीचा ऐवज असा एकूण ५ लाख ६९ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणातील शेख बासेद शेख सबूर हा आणखी एक आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दिवसा घरफोडी करून काही तासांतच लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या या टोळीतील दोघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. उर्वरित आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


