Dhule Fake Milk; शिरपूरमध्ये भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक प्रकार; दूध उकळताच झाले रबरसारखे
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात पुन्हा एकदा भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिरपूर तालुक्यातील खर्दे गावातील रहिवासी आशाबाई बोरसे यांनी नेहमीप्रमाणे रात्री दूधवाल्याकडून अर्धा लिटर दूध खरेदी केले होते. मात्र हे दूध उकळल्यानंतर संपूर्ण दूध रबरसारख्या गोळ्यात बदलल्याचे आढळून आले.
दूध गरम करताच त्यामध्ये विचित्र बदल दिसून आला आणि काही वेळातच ते दूध रबरसारख्या गोळ्यात परिवर्तित झाले. तयार झालेला हा गोळा हाताने तुटू लागल्याने दुधामध्ये भेसळ झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार पाहून आशाबाई बोरसे यांना मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे त्या नेहमीच्या दूधवाल्याकडूनच दूध घेत असल्याने असा प्रकार पहिल्यांदाच घडल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शिरपूर तालुक्यात तीन ते चार महिन्यांपूर्वीही भेसळयुक्त दुधाचा असाच प्रकार उघडकीस आला होता. मात्र त्या घटनेनंतरही संबंधित प्रशासनाने ठोस कारवाई न केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
अशा प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असून लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांसाठी हे अत्यंत घातक ठरू शकते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दुधाचे नमुने तपासावेत तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.


