Dhule Crime: रामकृष्ण नगरात घरफोडी, सोन्याची माळ व घरातील सामान चोरी
धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामकृष्ण नगर परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामकृष्ण नगर येथील प्लॉट क्रमांक 77 मध्ये राहणारे फर्निचर व्यावसायिक प्रकाश पंढरीनाथ बोरसे हे एका विवाह सोहळ्यानिमित्त बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
यानंतर घरातील कपाटाची तोडफोड करून चोरट्यांनी सामानाची उचकापाचक केली. कपाटात ठेवलेली 5 ग्रॅम सोन्याची माळ, 2 पितळी पातेले, 2 तांब्याच्या घागरी आणि 2 स्पीकर असा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत तपास सुरू केला आहे. तसेच तपासासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.
अज्ञात आरोपींचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाण्याची शक्यता असून याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


