साक्रीत सौर ऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीचा पर्दाफाश; 6.97 लाखांचा मुद्देमाल जप्त
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सौर ऊर्जा प्रकल्पातून कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 6 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 23 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 7 ते 24 जानेवारी पहाटे 3 वाजेच्या दरम्यान साक्री तालुक्यातील कारखाने छाईल परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्पातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 45 हजार रुपयांचा कॉपर केबल चोरी करून नेला होता. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार 22 मार्च 2026 रोजी शेवाळी शिवारातील बजरंग हॉटेलसमोरील महामार्गावर सापळा रचण्यात आला. यावेळी MH-19/BM-3268 क्रमांकाच्या पिकअप वाहनातून फिरत असलेल्या संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मच्छिंद्र भट्टू जाधव (वय 25, रा. पेरजपूर, ता. साक्री), प्रविण रविंद्र जाधव (वय 24, रा. पेरजपूर, ता. साक्री) आणि सुलतान नुरा शाह (वय 26, रा. साक्री) यांचा समावेश आहे.
आरोपींकडून 197 किलो कॉपर केबल (किंमत अंदाजे 1 लाख 97 हजार रुपये) तसेच पिकअप वाहन (किंमत सुमारे 5 लाख रुपये) असा एकूण 6 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस चौकशीत या तिघांनी साक्री व निजामपूर परिसरात तीन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून, यापूर्वी नोंद असलेले काही गुन्हेही उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे आरोपी सुलतान नुरा शाह याच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.


