Dhule News सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांवर भीषण अपघात; शिरपूरजवळ स्कॉर्पिओची धडक, एका महिलेचा मृत्यू तर युवती जखमी
सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांवर दुर्दैवी अपघात ओढवला आहे. शिरपूर तालुक्यातील सुळे येथील एका महिलेचा या अपघातात जागीच मृत्यू झाला असून एक युवती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील नटवाडे फाट्यालगत असलेल्या पाटील ढाब्यासमोर घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुळे (ता. शिरपूर) येथील रहिवासी सखुबाई बाबूलाल भिल (वय ३५) आणि मनीषा कालूसिंग पावरा (वय १६) या दोघी काल (दि. २६) वणी येथील सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी पायी निघाल्या होत्या. सकाळी सुमारे ११.१५ वाजेच्या सुमारास त्या नटवाडे फाट्याजवळील पाटील ढाब्यासमोरून जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या स्कॉर्पिओ (क्रमांक २४ बीएच ६७१९ एच) वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात सखुबाई भिल या गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडल्या. तर मनीषा पावरा ही युवती गंभीर जखमी झाली असून नागरिकांनी तातडीने तिला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल शिंदे यांनी तपासणी करून सखुबाई भिल यांना मृत घोषित केले.
अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुळे गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत काही काळ ठिय्या आंदोलन केले, त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस, थाळनेर पोलीस तसेच महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, स्कॉर्पिओ वाहनाचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित चालक हा सैन्य दलात कार्यरत असून तो आपल्या पत्नीसोबत कर्तव्यावर हजर होण्यासाठी प्रवास करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या घटनेत मृत्यू झालेल्या सखुबाई भिल या आमदार काशिराम पावरा यांच्या गावातील रहिवासी असल्याने अपघाताची माहिती मिळताच आ. पावरा यांनी रुग्णालयात भेट देत जखमी युवतीची विचारपूस केली तसेच घटनास्थळाची पाहणी केली.
या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


