धुळ्यात टॅटूमुळे उलगडला खून; अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या, पती-पत्नी अटकेत
धुळे (प्रतिनिधी: नागिंद मोरे) : धुळे जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधाच्या रागातून एका पतीने आपल्या नात्यातील तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात आरोपीने पत्नी आणि अल्पवयीन मुलाच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावत तो विहिरीत फेकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अवधान एमआयडीसी परिसरातील एका विहिरीत सुमारे नऊ दिवसांपासून कुजलेल्या अवस्थेत एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटवणे कठीण झाले होते. मात्र, मृताच्या हातावरील ‘Radha’ आणि छातीवरील ‘RAVI’ या टॅटूमुळे पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला. त्यावरून मृताची ओळख दिवाणमळा येथील रवी मालचे अशी पटली.
तपासात पुढे उघड झाले की, रवी मालचे याचे आरोपी बापू मालचे यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. याच कारणावरून बापू मालचे याने 18 मार्चच्या रात्री पत्नीच्या मदतीने रवीची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह सायकलवरून नेऊन विहिरीत फेकण्यात आला.
या प्रकरणी मोहाडी पोलिसांनी वेगाने तपास करत अवघ्या 24 तासांत आरोपी पती-पत्नीला अटक केली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पुढील तपास सुरू आहे.


