Dhule Crime | शिरपूरात एमडी ड्रग्ज तस्करी उधळली: पोलिसांची मोठी कारवाई, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त
शिरपूर शहरात एमडी ड्रग नावाने कुख्यात असलेल्या मेफेड्रोन या अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यात शिरपूर शहर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. कारमधून अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या संशयिताला पोलिसांनी शिताफीने अटक केली असून या कारवाईत सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यामध्ये सुमारे चार लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग तसेच वापरात असलेली कार असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी शहादा फाट्यावर हॉटेल भद्रा समोर सापळा रचत संशयिताची कार थांबवून झडती घेतली. या वेळी त्याच्या खिशातून सुमारे 20 ग्रॅम एमडी ड्रग आढळून आले. जयपाल गिरासे असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून तो शिरपूर शहरातील रहिवासी आहे.
दरम्यान, संबंधित आरोपीने अंमली पदार्थ कुणाकडून घेतले आणि कोणाला विक्रीसाठी आणले होते याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ड्रग माफिया टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


