Dhule News धुळ्यात पाकिस्तान निर्मित सौंदर्यप्रसाधनांवर कारवाई; दोन व्यापाऱ्यांवर गुन्हे, 61 हजारांचा मुद्देमाल जप्त
धुळे | प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यात पाकिस्तान निर्मित सौंदर्यप्रसाधनांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 61 हजार 474 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. जय शंकर मार्केटमधील ‘श्री साई ट्रेडर्स’चा संचालक कैलास देवानंद नानकाणी (50) तसेच सार्वजनिक मार्केट परिसरातील ‘बिग बाजार’मधील फजलू रहेमान मोहम्मद सलीम अन्सारी (32) अशी संशयितांची नावे आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तयार करून 3 एप्रिल 2026 रोजी धुळे शहरात छापेमारी करण्यात आली.
जय शंकर मार्केट येथील ‘श्री साई ट्रेडर्स’ दुकानावर टाकलेल्या छाप्यात गोरी ब्युटी क्रीम, गोरी व्हायटनिंग साबण व चांदणी व्हायटनिंग क्रीम अशी विविध सौंदर्यप्रसाधने जप्त करण्यात आली. यांची एकूण किंमत 30 हजार 63 रुपये आहे.
त्यानंतर सार्वजनिक मार्केटमधील ‘बिग बाजार’ या दुकानावरही छापा टाकण्यात आला. येथे गोरी ब्युटी क्रीम, फैजा ब्युटी क्रीम, गोल्डन पर्ल क्रीम, डबल व्हाईट प्लस व्हिटॅमिन सी, फेस फ्रेश गोल्ड यांसारखी उत्पादने जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत 31 हजार 411 रुपये आहे.
या दोन्ही ठिकाणी जप्त करण्यात आलेली उत्पादने पाकिस्तान निर्मित असल्याचा पोलिसांना संशय आहे. संबंधित दुकानदारांकडे या वस्तूंची कोणतीही अधिकृत बिल किंवा परवाने आढळून आले नाहीत. केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार पाकिस्तानातून आयात करण्यात आलेल्या वस्तूंवर बंदी असतानाही या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.
तसेच ही सौंदर्यप्रसाधने मानवी आरोग्यास अपायकारक असण्याची शक्यता लक्षात घेऊनही ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाणे व धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून विदेशी व्यापार (विकास व विनियमन) अधिनियम 1992, भारतीय न्याय संहिता तसेच औषधी व सौंदर्य प्रसाधने अधिनियम 1940 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या पथकाने केली.
दरम्यान, नागरिकांनी परवाना नसलेली किंवा संशयास्पद सौंदर्यप्रसाधने खरेदी करू नयेत तसेच अशा प्रकारच्या बेकायदेशीर विक्रीबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


