Dhule Accident: धुळे जिल्ह्यात भीषण अपघात: वऱ्हाडींची क्रुझर उलटली; 4 ठार, 12 हून अधिक जखमी
साक्री (धुळे) | प्रतिनिधी
साक्री तालुक्यातील तामसवाडी परिसरात वऱ्हाडींना घेऊन जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, क्रुझर (क्र. एमएच 18 डब्ल्यू 6226) हे वाहन शिरडाणे येथून तामसवाडी येथे लग्नकार्य आटोपून परतत होते. दुपारच्या सुमारास अक्कलपाडा परिसरात समोरून हेलकावे खात येणाऱ्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे क्रुझर गाडी उलटली आणि हा भीषण अपघात घडला.
व्हिडिओ बातमी पहा
https://www.instagram.com/reel/DWtZsQMkaSz/?igsh=eTZwc2xjN3UyNXJt
या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 1 जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अपघातातील 12 हून अधिक जण जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
अपघातानंतर 108 रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना साक्री ग्रामीण रुग्णालय तसेच धुळे येथील हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सिव्हील सर्जन डॉ. रविंद्र सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देत मदतकार्याची पाहणी केली.
या दुर्घटनेमुळे तामसवाडी व शिरडाणे गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांकडून अपघाताची नोंद घेण्याचे काम सुरू असून पुढील तपास सुरू आहे.


