Dhule News धुळ्यात गावठी कट्टा बाळगणाऱ्या सलमान खानला अटक; देवपूर पोलिसांची कारवाई
धुळे | प्रतिनिधी
धुळे शहरात बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला देवपूर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सलमान खान जावीद खान (वय 20, रा. वीटभट्टी परिसर, नूर मस्जिदजवळ, देवपूर) असे आहे. आरोपीकडून पोलिसांनी 40 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व 2 हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे असा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे.
देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. देवपूर भागातील एकता नगरकडे जाणाऱ्या पांझरा नदीकिनारी एक संशयित गावठी पिस्टलसह फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पथक पाठवून सापळा रचला आणि संशयिताला ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान त्याच्याकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे आढळून आली. दरम्यान, आरोपी सलमान खान विरोधात यापूर्वीही शस्त्र अधिनियम व घरफोडीचे असे तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


