धुळे | प्रतिनिधी
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही दिसू लागला आहे. धुळे शहरात CNG/गो गॅसच्या किमतीत अचानक दुपटीने वाढ झाल्यामुळे रिक्षाचालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील गॅस पंपांवर आज सकाळपासून रिक्षाचालकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गॅस भरण्यासाठी चालकांना तासंतास रांगेत उभे राहावे लागत असून, तरीही अनेकांना गॅस उपलब्ध होत नसल्याची तक्रार आहे.
रिक्षाचालकांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी 70 ते 80 रुपये प्रति किलो दराने मिळणारा गॅस आता 185 ते 190 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे त्यांच्या दैनंदिन उत्पन्नावर मोठा परिणाम झाला असून आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
गॅस पंप चालकांकडून मनमानी दर आकारले जात असल्याचा आरोपही रिक्षाचालकांनी केला आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल, डिझेल व गॅस साठा सुरळीत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात पंपांवरील परिस्थिती वेगळी असल्याचे चित्र समोर येत आहे.
- वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीची समस्या देखील निर्माण होत आहे. ग्राहकांची होत असलेली लूट आणि अनियमित पुरवठा लक्षात घेता प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून कारवाई करावी, अशी मागणी रिक्षाचालकांकडून करण्यात येत आहे.


