धुळ्यात हिस्ट्रीशिटर ‘पोपण्या’ पोलिसांच्या ताब्यात; घरफोडीची कबुली, तलवार व चोरीची दुचाकी जप्त
धुळे | प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील चोरी, घरफोडी, दुचाकी चोरी व हाणामारीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला हिस्ट्रीशिटर रेहान उर्फ पोपण्या याला चाळीसगाव रोड पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुद्ध एकूण 17 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या चौकशीत पोपण्याने घरफोडीची कबुली दिली असून त्याने चोरीतील मुद्देमालही काढून दिला आहे. त्याच्या घरातून पोलिसांनी तलवार तसेच चोरीची दुचाकी जप्त केली आहे. याशिवाय शहरासह जिल्ह्यातील इतर चोरी-घरफोड्यांमध्येही त्याचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, माणिक नगर परिसरातील जावेद शहामद पिंजारी यांच्या घरात झालेल्या घरफोडीच्या प्रकरणात हा उलगडा झाला. या प्रकरणात पोलिसांनी अंबिका नगर येथील शाहिद मुख्तार शेख याला आधीच ताब्यात घेतले होते. त्याने रेहान उर्फ पोपण्या हा या गुन्ह्यातील साथीदार असल्याची कबुली दिली होती.
त्यानुसार चाळीसगाव रोड पोलिसांनी कारवाई करत पोपण्याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने पिंजारी यांच्या घरातून 3 लाख 45 हजार रुपये रोख व 5 ग्रॅम सोन्याचा तुकडा चोरी केल्याची कबुली दिली.
या प्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपीकडून आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


