धुळ्यात बनावट विदेशी दारू कारखान्यावर छापा; 1.43 लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
धुळे | प्रतिनिधी:
धुळे शहरात बनावट विदेशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे 1 लाख 43 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबिका नगर परिसरात, हॉटेल चंडिकाच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये ‘Imperial Blue’ नावाने बनावट विदेशी दारू तयार करून विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला. या कारवाईत रवींद्र रमेश महाजन (रा. दसरा मैदान, सहजीवन नगर, धुळे) याला ताब्यात घेण्यात आले.
छाप्यामध्ये बनावट विदेशी दारूचे बॉक्स, स्पिरिट, विविध रसायने, रिकाम्या बाटल्या तसेच बनावट स्टिकर्स असा एकूण 1 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी सदर बनावट दारू तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे.
या प्रकरणी पुढील कारवाई सुरू असून शहरात अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे.


