पिंपळनेरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ: एकाच रात्री तीन मोटारींच्या तांब्याच्या तारा चोरी, शेतकरी संतप्त
पिंपळनेर (धुळे) | प्रतिनिधी:
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चिकसे गांगेश्वर शिवारात चोरट्यांनी धुमाकूळ घालत शेतकऱ्यांच्या कृषी साहित्यावर डल्ला मारला आहे. एकाच रात्रीत तीन इलेक्ट्रिक मोटारींमधील तांब्याच्या तारा चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पांझरा नदीकिनारी असलेल्या प्रकाश रूपला डामरे, अक्षय प्रकाश डामरे आणि अशोक बुधाजी डामरे या शेतकऱ्यांच्या मोटारींमधील तांब्याच्या तारा अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. ऐन पिकांना पाणी देण्याच्या हंगामात हा प्रकार घडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतकऱ्यांना दिवसभर शेतात काम करावे लागत आहे. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.
“दिवसभर कष्ट करूनही रात्री आमचे साहित्य सुरक्षित नसेल, तर शेती करायची कशी?” असा संतप्त सवाल पीडित शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पिंपळनेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
शेतकरी
“आम्ही दिवसभर कष्ट करून शेती करतो, पण रात्री आमचे साहित्य सुरक्षित राहत नसेल तर शेती कशी करायची? पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी.”


