धुळे मनपात महिलाराज; स्थायी व महिला बालकल्याण समिती सभापतींची बिनविरोध निवड
धुळे | प्रतिनिधी
धुळे महानगरपालिकेत स्थायी समिती आणि महिला बालकल्याण समितीच्या सभापती पदांसाठी झालेल्या निवडणुकीत महत्त्वाच्या पदांवर बिनविरोध निवड होत ‘महिलाराज’ प्रस्थापित झाले आहे. या निवडणुकीमुळे महापालिकेच्या राजकीय वर्तुळात मोठी हालचाल पाहायला मिळाली.
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी इतर कोणत्याही उमेदवारांनी अर्ज दाखल न केल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या लताबाई सोनार यांची स्थायी समिती सभापतीपदी, तर उज्वला ठाकरे यांची महिला बालकल्याण समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. तसेच उपसभापती पदासाठी शोभा भील यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचा महापौर मायादेवी परदेशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर समर्थकांनी शहरात मिरवणूक काढून आणि घोषणाबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा केला.
धुळे मनपात महिलांना महत्त्वाच्या पदांवर संधी मिळाल्याने ‘महिलाराज’ स्थापन झाल्याची चर्चा रंगली असून आगामी काळात विकासकामांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मायादेवी परदेशी, महापौर, धुळे मनपा
“महिलांना नेतृत्वाची संधी मिळणे ही अभिमानाची बाब आहे. शहराच्या विकासासाठी सर्वांनी मिळून काम करू.”


