धुळ्यात कृषी पर्यवेक्षक ACBच्या जाळ्यात; 28 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक
धुळे | प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचन अनुदान प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या कृषी पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याची घटना धुळ्यात घडली आहे. कैलास तेले असे अटक करण्यात आलेल्या कृषी पर्यवेक्षकाचे नाव असून, या कारवाईमुळे कृषी विभागात खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
तक्रारदार यांचे नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा येथे ठिबक सिंचन साहित्य विक्रीचे दुकान असून शिरूड (ता. धुळे) येथे त्याची शाखा आहे. शासकीय अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून खरेदी झालेल्या ठिबक संचाची मोका तपासणी करून प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी पाठवण्याची जबाबदारी आरोपी कैलास तेले याच्याकडे होती.
हे काम करण्यासाठी तेले याने तक्रारदाराकडे 35 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी 10 हजार रुपये त्याने आधीच स्वीकारले होते. उर्वरित रकमेची मागणी कायम ठेवल्याने तक्रारदाराने ACBकडे तक्रार केली.
अशी झाली कारवाई
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर तेले याने 30 हजार रुपयांची मागणी करत तडजोडीअंती 28 हजार रुपये घेण्याचे मान्य केले. त्यानुसार धुळे शहरातील जय हिंद महाविद्यालय चौकात ACBने सापळा रचला. तक्रारदाराकडून 28 हजार रुपये स्वीकारताना पथकाने तेले याला रंगेहात पकडले.
कारवाई करणारे पथक
ही कारवाई ACBचे उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पद्मावती कलाल आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
दरम्यान, आरोपी कैलास तेले याच्याविरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


