शिरपूर तालुक्यात 48 तासांत दोन मृत्यू; कुलरला विजेचा धक्का बसून तरुण व विद्यार्थ्याचा मृत्यू
शिरपूर, धुळे | प्रतिनिधी:
शिरपूर तालुक्यात अवघ्या 48 तासांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी विजेच्या तीव्र धक्क्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. घरगुती कुलरमध्ये वीज प्रवाह उतरल्याने हे अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज असून, या घटनांमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
पहिली घटना भामपूर (ता. शिरपूर) येथे घडली. महेश मिला भरवाड हा तरुण कुलरजवळ गेला असता त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. हा धक्का इतका तीव्र होता की त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
दुसरी घटना होळनाथे (ता. शिरपूर) येथे घडली. हर्षल विनोद मराठे (वय 16) हा विद्यार्थी घरात अभ्यास करत असताना कुलरला स्पर्श झाला. कुलरमध्ये वीज प्रवाह असल्याने त्यालाही तीव्र धक्का बसून जागीच मृत्यू झाला. अल्पवयीन मुलाच्या मृत्यूमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या दोन घटना सलग घडल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाळ्यामुळे कुलरचा वापर वाढलेला असताना अशा दुर्घटनांनी नागरिकांची चिंता वाढवली आहे.
तज्ज्ञांच्या मते, कुलरच्या वायरिंगमधील दोष, योग्य अर्थिंगचा अभाव, पाणी भरताना विजेचा पुरवठा बंद न करणे किंवा ओल्या हाताने उपकरणाला स्पर्श करणे यामुळे असे अपघात घडतात.
दरम्यान, नागरिकांनी कुलर वापरताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुलरला योग्य अर्थिंग असणे, पाणी भरताना स्विच बंद करून प्लग काढणे, खराब वायरिंग टाळणे तसेच ओल्या अवस्थेत उपकरणाला स्पर्श न करणे आवश्यक आहे.
या घटनांच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण यंत्रणा, ग्रामपंचायत आणि प्रशासनाने जनजागृती मोहिमा राबवून नागरिकांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.


