धुळे; ग्रीन धुळे वृक्ष टिम आणि मनपा एकत्र; धुळे शहरात राबणार भव्य हरित अभियान
सीड बॉल, मियावाकी जंगल आणि “प्रत्येक घर — एक मोठे झाड” संकल्पनेवर भर
धुळे | प्रतिनिधी
धुळे शहर हरित, सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी ग्रीन धुळे वृक्ष टिम आणि धुळे महानगरपालिका आता संयुक्तपणे व्यापक वृक्ष लागवड व संवर्धन अभियान राबविणार आहेत. यासंदर्भात महानगरपालिकेचे आयुक्त सो. कापडणीस यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
मागील दोन वर्षांपासून लोकसहभागातून उभी राहिलेली ग्रीन धुळे वृक्ष टिम आता मनपाच्या अधिकृत सहकार्याने शहरभर हरित अभियान राबविणार आहे. बैठकीत येत्या मान्सूनसाठी तीन टप्प्यांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला.
पहिल्या टप्प्यात शहरभर सीड बॉल अभियान राबविण्यात येणार असून कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड, मियावाकी पद्धतीने ऑक्सिजन झोन निर्मिती तसेच “प्रत्येक घर — एक मोठे झाड” ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात बेकायदेशीर वृक्षतोड रोखण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.
नगरसेवक ललित दादा माळी यांच्या नेतृत्वाखाली ग्रीन धुळे वृक्ष टिमने शहरात पर्यावरणाबाबत मोठी जनजागृती निर्माण केली असून हजारो पर्यावरणप्रेमींना या अभियानाशी जोडले आहे. मनपाकडून विशेष अधिकारी व ११ सदस्यीय टिम या अभियानासाठी कार्यरत राहणार आहे.
बैठकीत आयुक्तांनी ग्रीन धुळे वृक्ष टिमच्या कार्याचे कौतुक करत प्रशासन आणि सामाजिक सहभागातून उभी राहिलेली ही चळवळ धुळे शहरासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.


