शिरपूर पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणारे तिघे जेरबंद, 2.27 लाखांचा मुद्देमाल जप्त
शिरपूर | प्रतिनिधी : नागिंद मोरे
शिंगावे शिवारातील फुलेनगर येथे बंद घर फोडून एलईडी टीव्ही व मोबाईल चोरी करणाऱ्या तीन अट्टल चोरांच्या टोळीला शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल आणि कारसह एकूण 2 लाख 27 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फुलेनगर येथील रहिवासी किरण ठाकूर यांच्या बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी एलईडी टीव्ही आणि मोबाईलची चोरी केली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच शिरपूर पोलिसांनी रात्रीच्या गस्ती दरम्यान भूपेश नगर परिसरात संशयास्पदरीत्या फिरणारी GJ 26 AE 3354 क्रमांकाची कार अडवली.
कारमधील जयेश धनगर, मुकेश पाटील आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश ऊर्फ रितीक माळी यांची चौकशी व झडती घेतली असता त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले असून पुढील चौकशीत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला.
या कारवाईत पोलिसांनी चोरीचा माल आणि कार असा एकूण 2 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव आणि पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलिसांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


