धुळे-नंदुरबार मार्गावर भीषण अपघात; एसटी बसला मालवाहू ट्रेलरची जोरदार धडक, चालक गंभीर जखमी
30 ते 40 प्रवाशांचे थोडक्यात बचाव; अपघातानंतर ट्रेलर चालक फरार
धुळे | प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे गावाजवळ धुळे-नंदुरबार मार्गावर एसटी बस आणि मालवाहू ट्रेलरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एसटी बस चालक अनिल देवरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. बसमधील सुमारे 30 ते 40 प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, धुळेहून नंदुरबारकडे जाणारी एसटी बस चिमठाणे परिसरातून जात असताना समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रेलरने बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर ट्रेलर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बसमधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. जखमी चालक अनिल देवरे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
दरम्यान, चिमठाणे ते सोनगीर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून संथगतीने सुरू असून, अपूर्ण रस्ता, पावसामुळे निर्माण झालेला चिखल, खड्डे आणि निसरडी परिस्थिती यामुळे या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या अपघातानंतर महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


