धुळ्यात १२ हजारांची लाच स्वीकारताना दोन तलाठी आणि खाजगी पंटर रंगेहाथ अटकेत
गौणखनिज वाहतुकीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी; एसीबीची चाळीसगाव चौफुली परिसरात कारवाई…
धुळ्यात गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकाकडून खाजगी पंटरच्या माध्यमातून १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन तलाठी आणि एका खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे धुळे जिल्ह्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
धुळे तहसील कार्यालयातील तलाठी दिनेश दिलवर दाभाडे, बाळापूरचे तलाठी मृणाल शरद नगराळे आणि खाजगी पंटर जयेश कैलास चौधरी अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
तक्रारदाराचा बांधकाम साहित्य वाहतुकीचा व्यवसाय असून त्यांचे हायवा वाहन धुळ्यातील साक्री रोडवर थांबले होते. यावेळी तलाठी दाभाडे आणि नगराळे यांनी वाहनचालकाकडून मालकाचा मोबाईल क्रमांक घेतला आणि तक्रारदाराला चाळीसगाव चौफुली येथे बोलावले.
तेथे ‘तुझ्या हायवाने वाहतूक करायची असेल तर २० हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा बेकायदेशीर गौणखनिज वाहतुकीचा गुन्हा दाखल करू,’ अशी धमकी देत लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर घाबरलेल्या तक्रारदाराने त्याचवेळी ८ हजार रुपये दिले. मात्र, उर्वरित १२ हजार रुपयांसाठी तगादा लावण्यात आल्याने तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर तलाठी दाभाडे यांनी उर्वरित लाचेची रक्कम खाजगी इसम जयेश चौधरी याच्याकडे देण्यास सांगितल्याचे समोर आले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने चाळीसगाव चौफुली परिसरात सापळा रचला.
सापळा कारवाईदरम्यान जयेश चौधरी याने तक्रारदाराकडून १२ हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर त्याने तलाठी नगराळे यांच्याशी फोनवर बोलून दिले. पुढे ही रक्कम तलाठी दिनेश दाभाडे यांच्याकडे सुपूर्द करत असताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पद्मावती कलाल आणि त्यांच्या पथकाने केली.


