शिरपूर पोलिसांची धडक कारवाई; इराणी गँगचा सराईत आरोपी पत्नीसह जेरबंद
शिरपूर, धुळे | प्रतिनिधी: नागिंद मोरे
महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळपोत हिसकावून महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणाऱ्या इराणी गँगच्या सराईत आरोपीला शिरपूर शहर पोलिसांनी पत्नीसह जेरबंद केले आहे. आशु उर्फ हसन अली नियाज अली इराणी असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यांमध्ये ३० हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शिरपूर शहरातील कॉलनी परिसरात दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळपोत बळजबरीने हिसकावून नेल्याच्या घटनांनंतर शिरपूर शहर पोलिसांनी तपास सुरू केला. CCTV फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत भुसावळ आणि फैजपूर परिसरात आरोपीचा शोध घेतला. मात्र आरोपी पोलिसांना गुंगारा देत फरार होत होता.
अखेर पोलिसांनी वेशांतर करून मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचला. या कारवाईत आशु उर्फ हसन अली नियाज अली इराणी याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत चोरीचा मुद्देमाल पत्नी फातिमा हसन अली इराणी हिच्याकडे ठेवला असल्याची माहिती आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी फातिमा हिला देखील ताब्यात घेतले.
दोघांकडून सुमारे ७५ हजार रुपये किमतीचे ३० ग्रॅम म्हणजेच तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या तपासादरम्यान शिरपूर पोलिसांनी आणखी दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
आशु उर्फ हसन अली नियाज अली इराणी याच्याविरोधात महाराष्ट्रातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये ३० हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे या कारवाईमुळे शिरपूर पोलिसांनी इराणी गँगविरोधात महत्त्वाची कारवाई केल्याचे मानले जात आहे.


