साक्रीत जेवणावरून वाद; कुऱ्हाड आणि दांडक्याने वार करत मित्राची हत्या
नाल्याकाठी जेवायला गेले अन् वाद विकोपाला; ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू…
कुऱ्हाड आणि लाकडी दांडक्याने डोक्यावर वार; दोन्ही संशयित काही तासांत ताब्यात…
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात जेवणावरून झालेल्या वादातून मित्राची कुऱ्हाड आणि लाकडी दांडक्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना दिघावे गावात घडली आहे. या घटनेत चैत्राम दिलीप माळीच (वय ४०) यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चैत्राम माळीच हे प्रकाश सोनवणे आणि रोहिदास जाधव या मित्रांसोबत शेतातील नाल्याजवळ जेवण्यासाठी गेले होते. यावेळी जेवणावरून तिघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
यावेळी प्रकाश सोनवणे याने कुऱ्हाडीने, तर रोहिदास जाधव याने लाकडी दांडक्याने चैत्राम माळीच यांच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात चैत्राम गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच साक्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन साक्री ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, मयताची बहीण संगीता माळीच यांच्या तक्रारीवरून प्रकाश सोनवणे आणि रोहिदास जाधव यांच्याविरोधात साक्री पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही तासांत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले असून, हत्येमागील नेमके कारण आणि घटनेचा पुढील तपास साक्री पोलीस करत आहेत.


