धुळ्यात पांझरा नदीपात्रात २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह; घातपाताच्या संशयाने खळबळ
धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे
धुळे शहरातील देवपूर परिसरात 23 वर्षीय तरुणाचा मृतदेह पांझरा नदीपात्रात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रात्री घरातून बाहेर पडलेला तरुण दुसऱ्या दिवशी नदीपात्रात मृतावस्थेत आढळून आल्याने त्याच्या मृत्यूबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
देवपूर परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 जवळील बिलाडी गावाच्या शिवारात एका तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच आझाद नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची ओळख पटवली. सदर तरुणाचे नाव कृष्णा लक्ष्मण चौधरी, रा. बापू भंडारी गल्ली, एकविरा देवी मंदिराजवळ, देवपूर, धुळे असे असल्याचे समोर आले.
दरम्यान, कृष्णा चौधरी हा काल रात्री घरातून बाहेर पडला होता. मात्र, तो घरी परतलाच नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह पांझरा नदीपात्रात आढळून आल्याने त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
कृष्णा रात्री कोणासोबत होता? तो नदीपात्रापर्यंत कसा पोहोचला? त्याचा कोणाशी पूर्वी वाद किंवा वैमनस्य होते का? या सर्व बाबींचा तपास आता आझाद नगर पोलीस करणार आहेत.
पोलिसांनी मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवला असून प्राथमिक तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, कृष्णाचा मृत्यू अपघाती आहे की यामागे घातपात आहे, याबाबत परिसरात चर्चा सुरू असून नातेवाईकांकडूनही घातपाताचा संशय व्यक्त केला जात असल्याची माहिती आहे. मात्र, घातपाताची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.


