शिरपूर तालुक्यात FDA ची धडक कारवाई; 11.32 लाखांचा गुटख्यासह 87 हजारांची मका पावडरही ताब्यात
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील हाडाखेड तपासणी नाका गेल्या काही वर्षांत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि अंमली पदार्थांच्या तस्करीचा संवेदनशील मार्ग म्हणून वारंवार चर्चेत राहिला आहे.
मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या वाहनांमधून कोट्यवधी रुपयांचा गुटखा, गांजा आणि अन्य प्रतिबंधित माल वेळोवेळी जप्त करण्यात आला आहे. अशा पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने हाडाखेड नाक्यावर केलेल्या ताज्या कारवाईत 11 लाख 32 हजार 600 रुपयांचा गुटखा व पानमसाला जप्त केल्याने या मार्गावरील बेकायदा वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर सुरू केलेल्या कठोर कारवाईच्या पार्श्वभूमीवर या तस्करीला आळा बसणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.
शुक्रवारी हाडाखेड तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी सुरू असताना इंदोरहून पुण्याकडे जाणारी (एनएल-01/एएफ-1275) मालमोटार संशयाच्या आधारे थांबविण्यात आली. तपासणीदरम्यान महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व पानमसाल्याची 1 हजार 275 पॅकेट्स आढळून आली.
या मालाची किंमत 11 लाख 32 हजार 600 रुपये असून, संपूर्ण साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चालक नजीर माजिद (रा. मेवात, ता. नुह, हरियाणा) याच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच मोहिमेत अन्न व औषध प्रशासनाने शिरपूर तालुक्यातील मांडळ शिवारातील मे. रतलाम इंटरप्रायझेस येथेही तपासणी केली. संशयाच्या आधारे 725 किलो मका पावडर (स्टार्च) जप्त करण्यात आली. सुमारे 87 हजार रुपये किमतीचा हा साठा ताब्यात घेऊन त्याचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.
प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


