धुळ्यात बसमधून 16 लाख 52 हजारांचा मावा जप्त; भेसळीच्या संशयावरून FDA ची कारवाई…
प्रतिनिधी: नागिंद मोरे
अन्न व औषध प्रशासनाने धुळे तालुका पोलिसांच्या सहकार्याने मोठी कारवाई करत लक्झरी बसमधून वाहतूक करण्यात येत असलेला तब्बल 5 हजार 385 किलो मावा (खवा) जप्त केला आहे. या माव्याची अंदाजे किंमत 16 लाख 52 हजार 100 रुपये असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. भेसळीच्या संशयावरून हा साठा जप्त करून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासन आणि धुळे तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाने सकाळी सुमारे 6 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील मोराणे हद्दीत, साक्री रोडवरील हॉटेल बालाजीजवळ संबंधित बस थांबवून तपासणी केली. यावेळी बसमध्ये विविध कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात मावा आढळून आला.
त्यानंतर पुढील कारवाईसाठी संबंधित वाहन टोल नाक्याजवळील दिसान कोल्ड स्टोरेजमध्ये नेण्यात आले. तेथे माव्याच्या साठ्यातील विविध 13 प्रकारच्या अन्नपदार्थांचे नमुने अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने संकलित केले.
सर्व नमुने अधिकृत प्रयोगशाळेत गुणवत्ता आणि भेसळ तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


