धुळे हादरले! गर्भवतीला पेट्रोल टाकून जाळले; गरताडबारीतील क्रूर हत्याकांडाचा उलगडा
धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे
धुळ्यात गर्भवती महिलेचा जळालेला मृतदेह आढळून आलेल्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. तब्बल 275 किलोमीटर दूर जामखेडहून महिलेचा मृतदेह धुळ्यात आणून पेट्रोल टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आला आहे. तब्बल 11 तासांच्या सीसीटीव्ही तपासातून MH-43/AR-4070 या कारचा माग काढत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.
या प्रकरणात एकूण सहा आरोपी निष्पन्न झाले असून, त्यापैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आणखी दोन आरोपी फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
धुळे-सोलापूर महामार्गावरील गरताडबारीजवळ गर्भवती महिलेचा जळालेला मृतदेह आढळून आल्यानंतर मोहाडी पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळावरील परिस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासाला सुरुवात केली.
तपासादरम्यान संशयित कारचा माग काढत पोलिस जामखेड येथील सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्रापर्यंत पोहोचले. पोलिसांच्या माहितीनुसार, कला केंद्रातील अंतर्गत वादातून पिंकी हनुमंत काटकर (वय 31) या गर्भवती महिलेवर बीडजवळ मारहाण करण्यात आली.
मारहाणीनंतर महिला बेशुद्ध पडली. तिचा मृत्यू झाल्याचे समजून आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
त्यानंतर मृतदेह कारमधून धुळ्याच्या गरताडबारी परिसरात आणण्यात आला. निर्जन डोंगराळ भागात मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळल्याचा आरोप आहे.
सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत चार आरोपींना अटक केली आहे. फरार असलेल्या आणखी दोन आरोपींचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहेत.
या प्रकरणात सफराज उर्फ शफीक अलीम मोमीन (३८, रा. गांधीनगर, कळंब, जि. धाराशिव), आरिफ उर्फ खुज्या आसिफ शेख (३१, रा. इंदिरानगर, हावरगाव रोड, कळंब), स्वाती उर्फ आरती गणेश कुऱ्हाडे (२८, रा. सप्तसूर कला केंद्र कॉलनी, जामखेड, जि. अहमदनगर) आणि लक्ष्मी बालाजी पवार (३०, रा. बसस्थानक डेपोच्या पाठीमागे, कळंब, जि. धाराशिव) यांना २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी अटक करण्यात आली.


