धुळे हादरले! गरताडबारीनंतर देवभाने शिवारातही महिलेचा मृतदेह; सोनगीर पोलिसांकडून तपास
धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे
धुळे शहराजवळील गरताडबारी परिसरात काही दिवसांपूर्वी महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची घटना ताजी असतानाच, आता देवभाने शिवारात पुन्हा एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील देवभाने शिवारातील एका शेतात सुमारे 45 ते 50 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच फॉरेन्सिक लॅबचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून, घटनास्थळावरील पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे.
मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून तिचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येणार असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांत दुसऱ्यांदा महिलेचा मृतदेह आढळून आल्याने धुळे परिसरात चर्चांना उधाण आले आहे. गरताडबारीतील जळीत हत्याकांडानंतर आता देवभाने शिवारातील या घटनेने पोलिसांसमोर आणखी एक तपासाचे आव्हान उभे राहिले आहे.
देवभाने शिवारातील महिलेचा मृत्यू नेमका कसा झाला? हा घातपात आहे की अन्य काही कारणामुळे मृत्यू झाला? मृत महिलेची ओळख काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे सोनगीर पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत.


