महाराष्ट्रातील मुसलमानांचा सर्वात मोठा नेता इम्तियाज जलील; धुळ्यात ओवेसी यांचे वक्तव्य
धुळे | प्रतिनिधी
धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज धुळे शहरात एमआयएम पक्ष प्रमुख तथा खासदार असुद्दीन ओवेसी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना ओवेसी यांनी खासदार इम्तियाज जलील यांचे जोरदार कौतुक करत त्यांना “महाराष्ट्रातील मुसलमानांचा सर्वात मोठा नेता” असे संबोधले.
ओवेसी म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये इम्तियाज जलील यांचा पराभव झाला असला तरी त्यांचे नेतृत्व आणि जनाधार कमी झालेला नाही. निवडणुकीत पराभव झाला म्हणून नेतृत्व संपत नसते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी ओवेसी यांनी महायुतीतील नेत्यांवर जोरदार टीका केली. अजित पवार यांच्यावर बोलताना ओवेसी म्हणाले की, “अजित पवार हे त्यांच्या काकांचे म्हणजे शरद पवार यांचे झाले नाहीत, ते त्यांच्या सोबत असलेल्या नेत्यांचेही झाले नाहीत, मग ते तुमचे काय होतील?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी धुळे शहराचे माजी आमदार फारूक शाह यांनाही टोला लगावला.
महायुतीतील विरोधाभासांवर टीका करताना ओवेसी म्हणाले की, मुंबईत एकाच मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र बसतात, मात्र निवडणुकीत हे वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत. “हे नेते जनतेला मूर्ख बनवत असून त्यांची नुरा कुस्ती सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्रातील जनता ही राजकीयदृष्ट्या सजग असून ती हा तमाशा शांतपणे पाहत असल्याचे सांगत ओवेसी म्हणाले की, योग्य वेळी जनता याचा हिशेब करेल. राज्यात “पकड-सोड” प्रकारचे राजकारण सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.
यावेळी ओवेसी यांनी धुळ्यात एमआयएमच्या उमेदवारांना धमकावण्यात येत असल्याचा आरोप केला. “धमक्यांना आम्ही घाबरणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
पंधरा तारखेला होणाऱ्या मतदानावरूनही ओवेसी यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत, एका मंत्र्याच्या वक्तव्याचा संदर्भ देत टोला लगावला. तसेच वक्फ बोर्ड कायद्याबाबत बोलताना ओवेसी यांनी हा कायदा भारतीय संविधानातील अनुच्छेद १४, २५ आणि २६ च्या विरोधात असल्याचा आरोप केला.
हा कायदा मज्जिद, दर्गा आणि कब्रस्तानांच्या मालकीवर गदा आणण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत ओवेसी यांनी केंद्र सरकारसह राज्यातील सत्ताधारी नेत्यांवर गंभीर आरोप केले. या मुद्द्यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.


