धुळे एलसीबीची मोठी कारवाई; 12 किलो गांजासह दोघांना अटक, 3.50 लाखांचा मुद्देमाल जप्त
धुळे | प्रतिनिधी: नागिंद मोरे
धुळे स्थानिक गुन्हे शाखेने अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करत 12 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धुळे शहरातील विश्वकर्मा भवन परिसरात सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान निखिल गोकुळ पाटील आणि चेतन जीवन पावरा यांच्या ताब्यातून 3 लाख रुपये किमतीचा 12 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली MH-18/BK-0311 क्रमांकाची अॅक्टिव्हाही जप्त करण्यात आली.
या कारवाईत 3 लाख रुपयांचा गांजा आणि 50 हजार रुपयांची दुचाकी असा एकूण 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.


