धुळ्यात मंदिरातील चोरीचा अवघ्या काही तासांत छडा; पाठलाग करून आरोपीला रंगेहात अटक
धुळे | प्रतिनिधी: नागिंद मोरे
धुळे शहरातील दसरा मैदान परिसरातील एका मंदिरात चोरी करून पसार झालेल्या आरोपीला धुळे शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली. पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेत पोलिसांनी 15 हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे मंदिरातील दानपेटी फोडून रोकड आणि चांदीचे साहित्य चोरी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर धुळे शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने परिसरात शोधमोहीम सुरू केली. रेल्वे वसाहतीजवळ संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका तरुणाचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने मंदिरातील चोरीची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव समीर शहा रमजान शहा असे असून, त्याच्याकडून लोखंडी दानपेटी, चांदीचा मुकुट, चांदीची साखळी आणि रोख रक्कम असा सुमारे 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली.


