धुळे; 150 कोटी कर्जाच्या ठरावावरून धुळ्यात राजकारण तापले; शिवसेनेचे महापौरांना निवेदन
धुळे | प्रतिनिधी :
धुळे महानगरपालिकेच्या उद्याच्या महासभेत मांडण्यात येणाऱ्या 150 कोटी रुपयांच्या कर्जाच्या ठरावावरून शहरातील राजकारण तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या ठरावाला तीव्र विरोध करत महापौरांना निवेदन सादर केले आहे.
शिवसेनेने आरोप केला आहे की, केंद्र शासनाच्या अमृत 2 योजनेअंतर्गत मलनिस्सारण प्रकल्पासाठी महानगरपालिकेच्या 30 टक्के हिस्स्यासाठी 150 कोटी रुपयांचे कर्ज उचलण्याचा प्रस्ताव हा बेकायदेशीर आणि महानगरपालिकेच्या आर्थिक मुळावर घाव घालणारा आहे.
शिवसेनेच्या निवेदनानुसार, धुळे महानगरपालिकेवर आधीच एलआयसीच्या तापी योजनेचे सुमारे 250 कोटी रुपये, खुल्या बाजारातील 100 कोटींपेक्षा अधिक कर्ज तसेच पाटबंधारे खात्याची थकीत पाणीपट्टी असा मोठा आर्थिक बोजा आहे. अशा परिस्थितीत आणखी कर्ज घेणे म्हणजे शहराला आर्थिक संकटात ढकलण्यासारखे असल्याचा आरोप करण्यात आला.
“महापालिकेची तिजोरी रिकामी आहे. कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन वेळेवर होत नाहीत. अशा परिस्थितीत 150 कोटींचे कर्ज घेऊन त्याची परतफेड कशी होणार?” असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.
तसेच, ज्या मलनिस्सारण योजनेसाठी हे कर्ज घेतले जाणार आहे, त्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे या ठरावाला महासभेत विरोध करून तो फेटाळण्याचे आवाहन शिवसेनेने नगरसेवकांना केले आहे.
महापौरांना देण्यात आलेल्या निवेदनावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, धिरज पाटील, संदीप सूर्यवंशी, प्रशांत ठाकूर, नरेंद्र परदेशी, अण्णा फुलपगारे, शिवाजी शिरसाळे, पंकज भारस्कर, कपिल लिंगायत, गोकुळ बडगुजर, सुरज भावसार, इश्तियाक असारी, तेजस सपकाळ आदी उपस्थित होते.


