Dhule News:“शेती करणं जणू गुन्हाच!” शिंदखेड्यात अवकाळी व भावगळतीचा दुहेरी फटका; बळीराजा हवालदिल
शिंदखेडा (धुळे) | प्रतिनिधी:
अवकाळी पाऊस आणि बाजारातील घसरलेले दर या दुहेरी संकटात सापडलेल्या शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी सध्या हतबल झाले आहेत. टेमला गावातील शेतकरी पदमसिंग जयसिंग गिरासे यांनी व्यक्त केलेली उद्विग्नता आज राज्यातील शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती समोर आणत आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतातील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढून गोण्यांमध्ये भरलेला कांदा विक्रीसाठी तयार असतानाही बाजारात खरेदीदार नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. परिणामी कांद्याला अक्षरशः मातीमोल भाव मिळत असल्याचे चित्र आहे.
केवळ कांदाच नव्हे, तर मका आणि गव्हाच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. कालपर्यंत 2300 रुपये दराने विकला जाणारा मका आज 1500 रुपयांवर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
दुसरीकडे उत्पादन खर्च मात्र मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. खताच्या गोणीचा दर 700 रुपयांवरून थेट 1700 रुपयांपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण आणखी वाढला आहे.
या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी मानसिकदृष्ट्याही खचले असून “आता शेती करणं म्हणजे जणू गुन्हाच झाला आहे” अशी तीव्र प्रतिक्रिया पदमसिंग गिरासे यांनी व्यक्त केली. सरकारने तातडीने परिस्थितीची दखल घेऊन मदत न केल्यास शेतकऱ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पदमसिंग गिरासे, शेतकरी
“अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आणि बाजारात भावही मिळत नाहीत. खर्च वाढतच आहे. अशा परिस्थितीत शेती करणं जणू गुन्हाच वाटत आहे. सरकारने तातडीने मदत करावी.”


