धुळ्यात तापमान 42°C पार; उकाड्याने जनजीवन विस्कळीत, आरोग्य विभागाचा उष्माघाताबाबत इशारा
धुळे | प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यात तापमानाने 42 अंशांचा टप्पा गाठल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडल्याचे चित्र दिसत असून थंड पेये व पाणीदार फळांची मागणी वाढली आहे.
हवामान विभागाने राज्यातील काही भागांत तापमान वाढण्याचा इशारा दिला होता. त्याचा परिणाम धुळे जिल्ह्यात स्पष्टपणे जाणवत असून मागील काही दिवसांत तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. तीन दिवसांपूर्वी 38 अंशांच्या आसपास असलेले तापमान रविवारी 40 अंशांवर गेले, त्यानंतर 41 अंशांवर स्थिरावून आता थेट 42 अंशांपर्यंत पोहोचले आहे.
सकाळी 9 वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागते, तर दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत उकाड्याचा कडाका अधिक वाढतो. त्यामुळे नागरिक शक्यतो घराबाहेर पडणे टाळत असून शहरातील रस्ते दुपारच्या वेळी सुनसान दिसत आहेत.
दरम्यान, बाजारात थंड पेये, लिंबू सरबत तसेच कलिंगड, खरबूज यांसारख्या पाणीदार फळांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे, गरज असल्यास डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ वापरावा, भरपूर पाणी प्यावे आणि शक्यतो सकाळच्या थंड वेळेतच कामे आटोपावीत, असा सल्ला देण्यात आला आहे.
तसेच उष्णतेमुळे मळमळ, अशक्तपणा किंवा चक्कर येणे यांसारखे त्रास जाणवल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असेही आरोग्य विभागाने सांगितले आहे.


