Dhule News शिरपूरात लग्नपत्रिकेच्या वादातून गोळीबार; मेहुण्यावर हल्ला, तिघे जखमी
धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे किरकोळ कारणावरून थेट गोळीबाराची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेत तिघे जखमी झाले आहेत. लग्न पत्रिकेत नाव नसल्याच्या कारणावरून हा वाद चिघळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी भरतसिंग नगर येथील योगेश उर्फ संदीप भगवान पाटील यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, संदीप पाटील हे त्यांच्या मित्र विशाल सोनवणे व प्रवीण कोळी यांच्यासह मारुती मंदिराजवळून जात असताना, दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
सागर दगडू पाटील, हर्षल उर्फ मोंटी रामोळे, भटू उर्फ भूषण पाटील, सुनील उर्फ भावश्या कोळी, विशाल बाबर, अमोल पाटील, गोपाल उर्फ चंद्रा चौधरी (सर्व रा. भरतसिंग नगर, शिरपूर) तसेच जयेश सुनील पाटील (रा. मराठा गल्ली) यांनी बंदुकीतून गोळीबार केला.
या हल्ल्यात संदीप पाटील यांच्या डाव्या हाताला गोळी लागली असून ते जखमी झाले आहेत. तसेच विशाल सोनवणे आणि प्रवीण कोळी हेही जखमी झाले आहेत. जखमींवर शिरपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी सागर पाटीलसह काही जणांना ताब्यात घेतले असून, जयेश पाटील हा अद्याप फरार आहे.
दरम्यान, आरोपी सागर पाटील हा जखमी संदीप पाटील यांचा मेहुणा असून, कुटुंबातील जुने वाद, शेतीचा वाद तसेच लग्न पत्रिकेत नाव नसल्याच्या कारणावरून हा हल्ला झाल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


