धुळ्यात भीषण अपघात; कार दुरुस्त करताना मेकॅनिकलचा ट्रकच्या धडकेत मृत्यू
धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे
धुळे तालुक्यातील नगाव गाव शिवारात मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी भीषण अपघाताची घटना घडली. रस्त्यावर नादुरुस्त झालेली कार दुरुस्त करत असतानाच मागून आलेल्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने जुनेद पठाण (वय अंदाजे ३०) या तरुण मेकॅनिकलचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
🚗 अपघात कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई–आग्रा महामार्गावर नगाव शिवारात एक कार अचानक बंद पडली होती. कार दुरुस्तीसाठी धुळे शहरातून मेकॅनिकल जुनेद पठाण यांना घटनास्थळी बोलावण्यात आले होते.
ते कार दुरुस्त करण्याचे काम करत असतानाच मागून आलेल्या भरधाव ट्रकने कारसह त्यांना जोरदार धडक दिली.
धडकेची तीव्रता इतकी होती की जुनेद पठाण यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
🚑 तत्काळ मदत व पोलिसांची कारवाई
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. टोल नाक्यावरील रुग्णवाहिकेच्या सहाय्याने तसेच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या मदतीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला.
दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास पश्चिम देवपूर पोलीस करीत आहेत.
⚠️ महामार्गावरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
या घटनेमुळे महामार्गावर रस्त्याच्या कडेला वाहन दुरुस्ती करताना आवश्यक सुरक्षा उपाय न केल्यास किती गंभीर परिणाम होऊ शकतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नागरिकांसह संबंधित यंत्रणांनी याबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे


