शिरपूर तालुक्यात भीषण अपघात; लग्नासाठी निघालेल्या दाम्पत्याच्या कारला पिकअपची धडक, पतीचा जागीच मृत्यू
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात रविवारी सकाळी भीषण अपघात घडून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. लग्न समारंभासाठी निघालेल्या दाम्पत्याच्या कारला भरधाव पिकअपने जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत व्यक्तीचे नाव किशोर हिलाल मराठे (वय ४५) असे असून, त्यांच्या पत्नी योगिता मराठे या गंभीर जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील विखरण येथील किशोर मराठे आणि त्यांची पत्नी नंदुरबार येथे नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी कारने जात होते.
दरम्यान, वरुळ ते भामपूर रस्त्यावर समोरून येणाऱ्या भरधाव पिकअपने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. अपघातानंतर पिकअप वाहनही रस्त्यावर पलटी झाले.
या अपघातात किशोर मराठे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमी योगिता मराठे यांना वाहनातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
किशोर मराठे हे कुटुंबातील कर्ते पुरुष होते. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे मराठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. लग्न समारंभासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.


