Dhule Crime; अनैतिक संबंधांच्या संशयातून अवधानमध्ये एकाची चाकूने भोसकून हत्या; संशयित ताब्यात
धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे
धुळे शहरालगतच्या अवधान गावातील निंबा नगर परिसरात अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास निंबा नगर परिसरात स्थानिक नागरिकांना एक इसम रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती देत जखमीला हिरे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, धारदार हत्याराने झालेल्या गंभीर जखमांमुळे अतिरक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
किशोर धापटे (रा. निंबा नगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, काल रात्री किशोर धापटे आणि दिनेश वेंदे यांच्यात वाद झाला होता. किशोर हा दिनेशच्या घराजवळ दिसून आल्याने दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातून दिनेशने चाकूने हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेनंतर संशयित दिनेश वेंदे याने गावातून पळ काढला होता. मात्र, मोहाडी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत त्याला शिंदखेडा तालुक्यातून ताब्यात घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहेत.


