धुळे; आईचे सोने हडपण्याचा प्रयत्न; मुलीनेच रचला चोरीचा बनाव; पश्चिम देवपूर पोलिसांकडून गुन्हा उघड
खोटी तक्रार देऊन पोलिसांची दिशाभूल; महिला अटकेत, 90.30 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त
धुळे | प्रतिनिधी
धुळे शहरातील वलवाडी परिसरात घरातून 5 लाख 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार करणाऱ्या महिलेचाच चोरीचा बनाव असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. आईचे सोने हडप करण्यासाठी खोटी फिर्याद देत पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी सोनल भास्कर बागले हिला पश्चिम देवपूर पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वलवाडीतील सुंदरनगर येथील घरातून आई कस्तुरीबाई यांच्या मालकीचे 90.30 ग्रॅम वजनाचे, 5.60 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी, साक्षीदारांची चौकशी आणि तक्रारदाराच्या जबाबातील विसंगती लक्षात घेऊन सखोल चौकशी केली. त्यावेळी सोनल बागले हिनेच चोरीचा बनाव रचल्याची कबुली दिली.
यानंतर तिच्याकडून 5.60 लाख रुपये किमतीचे 90.30 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून, खोटी तक्रार देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या महिलेविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.


